जालना : जे रेशन दुकानदार वेळेवर धान्य पुरवठा करीत नाहीत, त्यांचे दुकान बदलण्याची सुविधा राज्य शासनाने लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्याने किंवा त्याच्यासोबत पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानातून धान्य घेत आहेत. जिल्ह्यातील २ हजार ६५० जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात. काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने दुकान बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थींना त्यांच्या सोयीच्या केंद्रातून धान्य उपलब्ध करून घेण्याची सोय करून देण्यात आली आहे.
शहरात जास्त बदल
n ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थलांतर होत असते.
n त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरातील दुकानात धान्य घेतात.
n या गावातील नागरिकांना अन्य दुकानातून पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेता येते. मजूर, कामगार, ऊसतोड मजूर हे या पोर्टेबिलिटीच्या साहाय्याने धान्य घेत आहेत.
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
n प्रधानमंत्री गरीब कल्याण व राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना मे, जून महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले. यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदय कार्डधारकांना लाभ मिळत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतिव्यक्ती २ किलो गहू वितरित होत आहे.