जालना : वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी संबंधिताना आता डॉक्टरांचे शारीरिक वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. विशेषत: हे प्रमाणपत्रही डॉक्टरांना ऑनलाइन भरावे लागणार आहे.
गत काही वर्षापासून वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनापूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दैनंदिन दीडशेवर चालकांना लर्निंग परवाने दिले जात होते. कोरोनाकाळात ही संख्या पन्नासहून खाली आली आहे. त्यात नवीन नियमानुसार अनेकांना घरीच बसून ऑनलाइन लर्निंग लायसन काढता येत आहे. परंतु, वयाची चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना काढण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे.
लर्निंग लायसन्स ऑनलाइन
कोरोनाकाळात लर्निंग लायसन वाटपाचे कामही बंद करण्यात आले होते.
नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आता ऑनलाइन लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन पद्धतीने अनेजण लर्निंग लायसन्स काढत आहेत.
किती वयापर्यंत मिळते लायसन्स
वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी कमीत कमी वयाची १८ वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे.
१८ वर्षांनंतर कोणालाही वाहन चालविण्याचा परवाना काढता येतो.
वयाची चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर मात्र, डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
आता डॉक्टरांना मिळणार लॉगिन आयडी, पासवर्ड
वयाच्या चाळिशीनंतर वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक झाले आहे.
त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांनाही आरटीओकडून लॉगिन आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे.
त्यादृष्टीने आरटीओ विभागाकडून डॉक्टरांच्या संघटनेशी संपर्क सुरू आहे.
नियमानुसार कार्यवाही
वाहन परवाना काढण्यासाठी कमीत कमी वयाची १८ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. वयाच्या चाळिशीनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. इतर कागदपत्रे दिल्यानंतर नियमानुसार संबंधिताना परवाना दिला जातो.
- विजय काळे, परिवहन अधिकारी