राजूर : सामाजिक भान असणाऱ्या येथील तरुणांनी मंदिर परिसर, बसस्थानक, दवाखाने, आणि रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपणाऱ्या गरजवंतांना रविवारी ब्लँकेट्स व उबदार कपड्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
राजूर हे तीर्थक्षेत्र असल्याने अनेक भक्त, प्रवासी, वाटसरू, भिक्षुक येथे येतात. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी मनोरुग्णही आढळून येतात. दिवसभर पोटासाठी भटकंती करायची आणि रात्रीला निवाऱ्यासाठी मंदिर परिसर, बसस्थानकाचा सहारा घ्यायचा. रोजीरोटीसाठी घर सोडलेली, डोक्यावर हक्काचे छप्पर नसणारी आणि थंडीत कुडकुडणाऱ्या माणसांसाठी काहीतरी करायचे, या भावनेतून तरुणांनी हा उपक्रम राबविला आहे. यासाठी शनिवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजूर येथील गरजूंचा शोध घेऊन त्यांची संख्या निश्चित केली. यानंतर रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मंदिर परिसर, बसस्थानक व रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांच्या अंगावर झोपेत असतानाच अलगदपणे ब्लँकेट्स व उबदार कपडे टाकून परोपकाराची भावना जोपासली. यासाठी शासकीय कंत्राटदार सुधाकर दानवे, पंढरीनाथ करपे यांनी ब्लँकेट्स व उबदार कपडे उपलब्ध करून दिले. या उपक्रमात विठ्ठलराव पुंगळे, जगन्नाथ थोटे, प्रा. बाळासाहेब बोराडे, दीपक पारवे, विनोद पांडे, विष्णू गवळी, सुरेश पवार आदींनी सहभाग घेतला होता.