दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४२ पैकी आठ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुुळे रूग्णालयीन कामकाज विस्कळीत होत असून, याचा त्रास रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. शिवाय कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे.
दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दाभाडीसह परिसरातील ४३ गावे आणि २७ वाड्यांवरील नागरिकांना आरोग्याची सेवा दिली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, साथरोगाला आळा घालणे, विविध प्रकारचे लसीकरण यासह इतर आरोग्य विषयक उपक्रम आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावस्तरावर राबवावे लागतात. शिवाय ग्रामस्थांनाही आरोग्याची सेवा द्यावी लागते. परंतु, या रुग्णालयात आठ पदे रिक्त आहेत. किन्होळा येथे एएनएम, एमपीडब्ल्यू, आरोग्य केंद्रातील एएनएम, एलएचव्ही. व एच. एन व औषध निर्माता अधिकारी व शिपाई अशी एकूण सात पदे रिक्त आहेत. वातावरणातील बदलांमुळे सध्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय कोरोना लसीकरणासह इतर आरोग्य विषयक उपक्रमही राबवावे लागत आहेत. परंतु, या रिक्त पदांमुळे माहोरा व परिसरातील रुग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत आहे. शासकीय उपक्रमांवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. ही बाब पाहता या आरोग्य केंद्रांतर्गत रिक्त असलेली पदे भरावीत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.