देऊळगाव राजा : शेतीची मोजणी करून देण्याच्या कारणावरून भूमी अभिलेख कार्यालयात धिंगाणा घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरूध्द देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी घडली असून, या प्रकरणी तिघांविरूध्द देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक प्रियंका सावंत यांनी गुरूवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. सावखेड भोई शिवारातील गट क्रमांक ३६० व ३४७ या शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने रितसर अर्ज दिला होता. या शेत जमिनीची २८ जानेवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, राजेश भुतडा, राजेश इंगळे व अशोक मल्लावत यांचा काहीही संबंध नसतांना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी कार्यालयात येऊन जमीन मोजणीवरून वाद घालत शासकीय कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सावंत यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक मल्लावत यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर इतर दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास ठाणेदार संभाजी पाटील, पोलीस हवालदार गवई हे करीत आहेत.