शुल्क देण्याची मागणी
जालना : शासनाने कोरोनाच्या काळात इंग्रजी शाळांना मदत केली नाही. त्यात आरटीई प्रवेशाचे थकीत शुल्क अदा केलेले नाही. त्यामुळे थकीत शुल्क अदा केल्याशिवाय नवीन आरटीई प्रवेश स्वीकारणार नसल्याचा निर्णय इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
‘संजीवनी’तील थॅलेसिमिया डे केअर सेंटर सुरू
जालना : शहरातील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या थॅलेसिमिया डे केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना मोफत सुविधा मिळणार असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. शिवदास मिरकड, डॉ. कैलास राजगुरू, डॉ. शाम बागल यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. बळीराम बागल, डॉ. राजेंद्र राख, मिशन थॅलेसिमियाचे मिलिंद लांबे, गणेश चौधरी, शेळके आदींची उपस्थिती होती.
अवेळी सुटणाऱ्या बसमुळे प्रवासी त्रस्त
जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या जालना बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक बस अवेळी सुटत आहेत. अवेळी सुटणाऱ्या बसमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याचा फटका, विद्यार्थी, व्यापाऱ्यांसह शेेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन वेळेत बस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघातात होतेय वाढ
जालना : जालना ते सिंदखेड राजा या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. शिवाय जालना शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
महावीर नहार यांची शहरप्रमुखपदी निवड
अंबड : सुभाष चंद्रबोस सेनेच्या अंबड शहराध्यक्षपदी महावीर नहार यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते नहार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष विष्णू जाधव, आयुब अन्सारी, उपाध्यक्ष असलम खान, माजित अली खान, कादीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घाटोळे, शेख फजलोद्दीन, इरफान खान, तला अलीखान, शशीपाल चौधरी, सुभाष घाटोळी, राहुल मुळे, राहुल जाधव, रतन कांबळे, शंकर भागडे, हरी निकाळजे आदींची उपस्थिती हाेती.
बंद पथदिव्यांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय
वालसावंगी : शहरांतर्गत भागातील काही ठिकाणचे पथदिवे बंद पडले आहेत. बंद पथदिव्यांमुळे रात्रीच्यावेळी रस्ता शोधताना पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बंद पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
जालना : शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्रे लचके तोडत असल्याने शहरातील नागरिक जखमी होत आहेत. ही बाब पाहता नगर पालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
रोहिलागड : येथील जामुवंत उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयात सोमवारी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे, प्राचार्य एस. के. पठाण, शिक्षिका एस. एस. बागुल, शिक्षक दिनेश भागवत, डी.टी. सोनवणे, एस. व्ही. लिहिणार, ए. के. परदेशी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पी.एस. पावले यांनी तर आभार दिनेश भागवत यांनी मानले.