बदनापुरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती
बदनापूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बदनापूर येथे आयोजित कार्यक्रमात वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक एस. एम. झाडबुके यांनी मार्गदर्शन केले. वाढणारे अपघात आणि वाहन चालविताना चालकांनी घ्यावयाची दक्षता याची माहिती झाडबुके यांनी दिली. यावेळी वाहन चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पंचायत समितीच्या संघाला उपविजेतेपद
घनसावंगी : जिल्हास्तरीय कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत घनसावंगी पंचायतीच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या संघात शंकर बोबडे, शाम म्हस्के, सतीश गोलेकर, विश्वनाथ रगड, दीपक चौधरी, दीपक सोळंके, ज्ञानेश्वर पवार, सचिन डोके, बाळू पवार, नीलेश चेमटे, सिराज शेख, कृष्णा वाघ, धनंजय तांबळे आदींचा सहभाग होता.
२२ फेब्रुवारीपासून सैन्य भरतीचे आयोजन
जालना : सिगनल कौर ट्रेनिंग सेंटर, जबलपूर येथे युनिट हेडक्वार्टर कोट्यातून सेवारत सैनिकांचे पाल्य व सख्खे भाऊ, माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांसाठी सोल्जर टेक्निकल, सोल्जर जी. डी. ट्रेडसमॅन पदासाठी २२ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सैन्य भरती होत आहे. लाभार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांनी केले आहे.
विकास मंडळांना मुदतवाढीची मागणी
जालना : मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेशलाल चौधरी, विनायक चिटणीस, अशोक मिश्रा, बाबुराव सतकर, मोहन तलरेजा, प्रभू गोमतीवाले, शीतलप्रसाद पांडे आदींची नावे आहेत.