टेंभुर्णी : अकोलादेव येथील जीवरेखा धरणातील मुख्य कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्याने सध्या हे गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. सध्या कालवा परिसरातील रब्बी पिके पाण्यावर आली असताना हे गेट नादुरुस्त झाल्याने कालव्यातून पाणी केव्हा सुटणार, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले पाणी सुटून आता दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे दुसरे पाणी लवकर सोडावे, अशी मागणी टेंभुर्णीसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.
जाफराबाद तालुक्यातील ६.८८ दशलक्षघमी क्षमतेचे सर्वात मोठे धरण असलेल्या जीवरेखा धरणातून १७.६ किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. या कालव्यावर टेंभुर्णी, अकोलादेव, गणेशपूर, पापळ, गोंधनखेडा, सावंगी परिसरातील जवळपास १२९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या परिसरातील सर्व शेतकरी रब्बी हंगामासाठी कालव्याच्या पाण्यावर विसंबून असतात. यावर्षी धरण तुडुंब भरल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यात दीड महिन्यापूर्वी पहिले पाणी सुटल्याने त्या पाण्यावर रब्बी पिकांनी चांगली उभारी घेतली आहे. आता या पिकांना पाण्याची तीव्र गरज असताना ऐन वेळेवर गेट नादुरुस्त झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तातडीने दुरुस्ती करावी
पाटबंधारे विभागाने या गेटची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे. दुरुस्तीनंतर रब्बी हंगामासाठी तीन दिवसांच्या आत पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे, संजय सावंत, आमेर चाऊस, गजानन जाधव, मनोहर जाधव, विठ्ठल सपकाळ, मनोहर मुनेमानिक, ज्ञानेश्वर खांडेभराड, मनोज सावंत, श्याम खोत, शंकर खोत आदींनी केली आहे.