राजूर : संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर परिसर फुलून गेला होता. नूतन वर्ष व मार्गशीर्ष महिन्यामुळे संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.
कोरोना संकटामुळे सलग आठ महिने राजुरेश्वर मंदिर बंद होते. गेल्या महिन्यात प्रशासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने गेल्या चतुर्थीपासून राजुरेश्वर मंदिर उघडण्यात आले आहे. गणपती संस्थानकडून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मार्गशीर्ष महिेन्यात महिला उपवास करून धार्मिक व्रतवैकल्य पार पाडतात. तसेच नवीन वर्षातील पहिलीच चतुर्थी असल्याने चोहोबाजूंनी भाविकांनी राजुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मंदिर परिसरात विविध खेळण्यांसह नारळ, प्रसाद, फळांची दुकाने थाटण्यात आली होती. व्यापाऱ्यांचे व्यवसाय तेजीत होते. भाविकांची गर्दी वाढल्याने दुपारी मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार वारंवार घडत होता. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, परंतु, हे प्रयत्नही तोकडे पडत होते. हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता.