जालना शहरात जवळपास ६२ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांना दोन वर्षांपूर्वी नवीन वाढीव कर आकारणी करण्यात आली. तब्बल दहा वर्षांनंतर ही मालमत्ता करातील वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मागील वर्षीपासून लागू करण्यात येऊन वाढीव मालमत्तेनुसार ही वसुली सुरू केली होती; परंतु गेल्या वर्षी ऐन मार्चमध्ये कोरोना होता, तर यंदाही तीच स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे जालना पालिका प्रशासन हतबल झाले आहे.
६० कोटींच्या तुलनेत १५ मार्चपर्यंत केवळ १२ कोटी रुपये वसूल झाले आहेत, जे की केवळ एकूण वसुलीच्या २२ टक्के आहेत. ही वसुलीची टक्केवारी वाढावी यासाठी पालिकेकडून आता बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली. एकूणच यंदा आम्ही वसुलीसाठी सहा पथकांची स्थापना केली होती. त्यानुसार एमआयडीसी तसेच अन्य बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावून जास्तीत जास्त वसुलीचे आमचे उदिद्ष्ट असल्याचे नार्वेकर म्हणाले. नळपट्टी देखील अशीच मोठ्या प्रमाणावर थकली आहे. त्यामुळे पालिकेच्या एकूणच आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे हे नाकारून चालणार नाही.