जालना : पोलीस भरती प्रक्रिया होणार असली तरी भरती प्रक्रियेबाबत विविध जी आर निघत आहेत. पोलीस भरतीबाबत शासन स्तरावरून सतत विविध जी आर प्रसिध्द केले जात असल्याने भरतीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने मेगा पोलीस भरतीचे आश्वासन देत भरती प्रक्रिया राबविण्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनासह इतर विविध कारणांनी ही भरती प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकली नाही. त्यात सध्या शासनाने एकीकडे पोलीस भरती होणार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भरतीचा जी आर रद्द केला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून पोलीस भरती होणार की भरतीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार ? या प्रश्नाने भरतीसाठी गत तीन
-चार वर्षापासून प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, शासन स्तरावरून वेळेत भरती प्रक्रिया न झाल्याने भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक मुला- मुलींचे वयही शासकीय अटीच्या पुढे गेले आहे.
पोलीस भरतीकडे मोठ्या आशा लावून दिवसरात्र अनेक युवक- युवती मैदानावर घाम गाळण्यासह पुस्तकांचा अभ्यासही करीत आहेत. त्यामुळे शासनाने भरती प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय त्वरित घेऊन भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी हे युवक करीत आहेत.
जिल्ह्यात ११११ लोकांमागे एक पोलीस
जालना जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखाच्या पुढे आहे. मात्र जिल्हा पोलीस दलात केवळ १८०० च्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या आणि उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या पाहता तब्बल एक हजार १११ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी राहत आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे.
शिक्षण सुरू असताना पाहिलेले पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मागील चार वर्षापासून तयारी करीत आहे. शासन स्तरावरून पोलीस भरती जाहीर करण्यात आली. मात्र, भरती प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. भरतीची तयारी करणाऱ्या युवकांचा विचार करून शासनाने भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी.
- आनंद म्हस्के
साळेगाव, जालना
पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे बहुतांश मुले- मुली हे ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे आस्मानी संकटांमुळे शेतीचे घटलेले उत्पन्न आणि कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत न होणारी आहे. अशा स्थितीतही मुलांच्या तयारीसाठी पालक खर्च करीत आहेत. त्यामुळे विना विलंब पोलीस भरती करणे गरजेचे आहे.
- संतोष ढाकणे
चांदई एक्को, भोकरदन
मी गत तीन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. समोर उभा असलेल्या अनेक समस्यांवर मात करीत माझ्यासारखे इतर मुले तयारी करीत आहोत. त्यामुळे शासनाने या युवकांना दिलासा देण्यासाठी भरती प्रक्रिया राबवावी.
- नितेश चव्हाण, नेर, जालना