दोन दिवसांत १२५ शिक्षकांनी घेतली कोरोना लस
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या कोरोना लसीकरणाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. सध्या तालुक्यासाठी एकमेव उपलब्ध असलेल्या जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर हे लसीकरण केले जात आहे.
शुक्रवारी सुटी असतानाही टेंभुर्णी, कुंभारझरी, माहोरा आदी केंद्रातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे या लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला. दोन दिवसात तालुक्यातील १२५ शिक्षकांनी कोरोना लस घेतल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एम. पाटील यांनी दिली.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी आदींना कोरोना लस दिल्यानंतर आता जिल्हाभरात शिक्षकांसाठी ही व्यापक मोहीम राबविली जात आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले जात असून, तसा संदेश मोबाईलवर आल्यानंतर शिक्षक-शिक्षिका केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घेत आहे. तालुक्यातील १०० टक्के शिक्षकांचे या मोहिमेंतर्गत लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका विशेष परिश्रम घेत आहे.
लसीकरण सुरक्षित
कोरोना लस ही पूर्णतः सुरक्षित असून, यापासून कुठलाही त्रास होत नाही. तेव्हा कर्मचाऱ्यांनी मनात कुठलीही भीती न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा. पहिली लस घेतल्याच्या २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तालुक्यात आजपर्यंत लसीकरण झालेल्या कोणत्याही व्यक्तीत या लसीचे दुष्परिणाम जाणवलेले नाही.
डॉ. डी. एम. पाटील, वैद्यकीय अधीक्षक
===Photopath===
210221\21jan_22_21022021_15.jpg
===Caption===
शिक्षकाला कोरोनाची लस देताना डॉक्टर दिसत आहे.