जालना : मराठवाडा शिक्षक मतदार संघ आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात तब्बल तीन महिने आचारसंहिता राहणार आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ नये म्हणून आचारसंहिता लागण्याआधीच अनेक विकास कामांची उद्घाटने झालेली आहेत.मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी ४ जानेवारी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचारसंहिता सुरू असतानाच येत्या दोन ते तीन दिवसात केव्हाही अचानकपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी फेबु्रवारीमध्ये पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असून यासाठी आचारसंहिता राहणार आहे. जालना जिल्ह्यात आचार संहितेच्या धास्तीने पूर्वीच कोट्यवधी रूपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटने झालेली आहे. तर काही कामांचे उद्घाटन ५ जानेवारी रोजी होणार होते. मात्र मराठवाडा शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता ४ जानेवारी रोजी सायंकाळपासून लागू झाल्याने या विकास कामांचे उद्घाटन रद्द करण्यात आलेले आहे. तब्बल तीन महिने आचारसंहिता राहणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात मार्चपर्यंत राहणार आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 00:29 IST