चौकट
दूध उत्पादकांचे चार लाखांचे नुकसान
कोरोनाचे निर्बंध लावताना हॉटेलचालकांसह दूध उत्पादकांना या निर्बंधाचा मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात जवळपास ७०० पेक्षा अधिक लहानमोठी हॉटेल आहेत, जेथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सरासरी दहा हजार लिटर दूध दररोज विक्री होते, त्यामुळे बंदचा मोठा फटका दूध विक्रेत्यांना बसला आहे. त्यांचे दररोज चार लाख रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे डेअरीमध्ये अचानक दुधाची आवक वाढली असून, येथे ३४ रुपये लिटरने दूध विकले जाते, तर हॉटेल चालकांकडून सरासरी ४० रुपये प्रतिलिटर असा भाव मिळतो.
-----------------------------
हॉटेलमधील कामगारांवर आर्थिक संकट
कोरोनाच्या फैलावामुळे जिल्ह्यातील हॉटेल, खानावळी बंद आहेत. यामुळे हॉटेलमध्ये काम करणारे अडचणीत सापडले असून, सरासरी १५० रुपये रोज कामगारांना, तर वस्ताद अर्थात पदार्थ बनविणाऱ्यास ५०० रुपये रोज मिळतात; परंतु हॉटेल बंद असल्याने अनेकांनी त्यांच्या हॉटेलमधील कामगार कमी केले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास आणखी गंभीर स्थिती उत्पन्न होऊ शकते, अशी भीती हॉटेल असोसिएशनचे सदस्य मोहन इंगळे यांनी व्यक्त केली.
चौकट
हिरव्या पानाचा देठ काळवंडला
कोरोनामुळे पानटपऱ्या देखील बंद आहेत. त्यामुळे दररोज एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. अनेक दुकानांमधून आता खर्रा बंद झाला आहे. असे असताना चोरीछुपे गुटखा विक्री होत आहे. गुटखा आणि सिगारेटप्रमाणेच पानटपरीत विड्याच्या पानांना मोठी मागणी असते. त्यात साधे पान आणि कोलकत्ता पानांचा समावेश असतो. ही दोन्ही पाने आंध्र प्रदेश आणि बंगालमधून येतात. त्यामुळे या पानांची आवक घटल्याने पानटपरी चालकांप्रमाणेच पानमळ्यातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसल्याची माहिती पानटपरी चालक मोहन लुंगे यांनी दिली.