सूक्ष्म नियोजन प्रक्रिया
जालना : बदनापूर तालुक्यातील मांडवा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गाव निहाय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया कार्यक्रमास सरपंच झिंगरा मिसाळ, शेती शाळा समन्वयक नंदकिशोर पुंड, वंदना गुम्मलवार, सतीश नागरे, शरद शिंदे आदी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर नळाचे पाणी
जालना : जुना जालन्यातील कसबा, देहडकरवाडी, माळीपुरा या भागात नळांना पाणी आल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी होत आहे. या भागातील जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागलेली आहे. तर काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरून झाल्यानंतर सुरूच राहणाऱ्या नळातून रस्त्यावर पाणीच पाणी होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सरस्वती मंदिर परिसरात सुविधांचा अभाव
जालना : शहरातील खरपुडी रोडवरील सरस्वती मंदिर परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या भागात अद्यापही नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मनापूर परिसरात मटका तेजीत
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील मनापूर शिवारात गेल्या काही दिवसापासून खुलेआम मटका सुरू असून, याकडे पोलीस यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मनापूर शिवारात मटका जोरात सुरू आहे. त्यामुळे मटका एजंटांची संख्या वाढताना दिसत आहे. मटका चालकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मंदिरात सुरक्षित अंतराचे पालन होईना
जालना : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यानंतर धार्मिक स्थळे मंदिरे, उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. मात्र, गर्दीत एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे पहावयास मिळत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
धावडा परिसरातील ग्रामपंचायतीत लावले फलक
जालना : शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावाच्या शिवारातील जमिनीमध्ये उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्ये व इतर घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत पिकनिहाय किती प्रमाणात द्यायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शक ठरणारे जमीन सुपिकता निर्देशांक फलक धावडा मंडळातील २३ गावांमध्ये लावण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात वालसांवगी, वाढोणा, पारध बुद्रूक, पिंपळगाव रे. आदी गावांचा समावेश आहे.
अंबड येथे नागरिकांना ३९१ मास्कचे वाटप
अंबड: छत्रपती शिवरायांच्या ३९१ जयंतीनिमित्त अंबड येथील सहयोग परिवाराच्या वतीने खडकेश्वर आणि अंबड येथे ३९१ मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, सर्व नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. मास्क व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे आवाहन ओमप्रकाश उबाळे, संतोष सोमाणी, प्रल्हाद जाधव, इंजि. गावडे, तुकाराम भापकर, सतीश भावले, गणेश लाहोटी, सतीश सोडाणी, प्रकाश परजणे यांनी केले आहे.