उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाला दर वाढले; बाजारात तेजी
जालना : बाजारात कैऱ्यांचे आगमन झाले आहे. असे असले तरी अद्याप वर्षभरासाठी पुरणारे अंब्याचे लोणचे हे चांगला पाऊस झाल्यानंतरच घातले जाते. असे असले तरी कोरोनामुळे आजही मसाल्याचे भाव चांगलेच तेजीत असल्याचे जालना बाजारपेठेतील चित्र आहे.
दररोजच्या जेवणामध्ये देखील मसाल्याचे पदार्थ हे आवर्जून वापरले जातात. मसाल्याचे पदार्थ म्हणजे एकप्रकारे आयुर्वेदिक औषधीच असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांमधून शरीराला हवी असलेली पोषक तत्त्वे मिळतात, तर काही मसाले हे पदार्थांना चव यावी म्हणून देखील स्वयंपाकात वापरले जातात. यामध्ये प्रामुख्याने लाल तिखट, काळे तिखट, आदींचा वापर सर्वांत जास्त असतो. काही घरांमध्ये ताजे मसाले करण्यासाठी मसाले बनविण्यासाठीचा कच्चा माल बाजारात जाऊन विशेष करून गृहिणी खरेदी करतात. मसाल्याची आवड ही भारतीयांना पुर्वापार आहे; परंतु मध्यतंरी ॲसिडिटीचे प्रकार वाढू लागल्याने मसाल्यांची मागणी घटली होती.
मिरची येते आंध्रातून
n आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे देशातील मिरचीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेसह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ तसेच जालना येथून मिरची जालन्यातील मोंढ्यात येते
n गेल्या काही दिवसांमध्ये लाल मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले होते. आता गुंटूर येथून मिरचीची आवक सुरू झाल्याने दर घसरले आहेत.
मसाले आणि स्वयंपाक यांचे समीकरण असते. त्यामुळे कुठल्याही पदार्थाला झणझणीत बनविण्यासाठी मसाल्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेष करून मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी मसाले हा अविभाज्य घटक मानला जातो. शाकाहारी जेवणातही मसाल्यांना मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. असे असले तरी येथे वापरण्याचे प्रमाण कमी असते.
- माया लोंढे, गृहिणी
जालना येथील बाजारपेठेत मसाल्याचे सर्वच पदार्थ तेजीत आहेत. कोरोनाचे कारण आणि मागणी आणि पुरवठ्यातील विस्कळीत झालेले गणित यामुळे पाहिजे तेवढा कच्चा माल येत नाही. त्यामुळे मसाला पदार्थांचे दर वाढलेलेच आहेत. वेगवेगळे किरकोळ प्रकारचे साहित्य घेऊन ताजे मसाले बनविणावर गृहिणींचा भर असतो. त्यामुळे काहीअंशी किमती वाढल्या आहेत.
- रितेश रुणवाल, व्यापारी