भोकरदन : स्थलांतरीत बालकासंदर्भातील बालरक्षक चळवळ आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक कल्पना क्षीरसागर यांनी दिल्या. भोकरदन येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीत त्यांनी तालुक्यातील स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा केंद्रनिहाय आढावा घेतला. तसेच विविध शाळेत राबविण्यात येत असलेल्या डेन्स फॉरेस्ट बाबतचा आढावादेखील घेतला. या बैठकीला गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी रघुवीरसिंग चंदेल, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी डी.एम.जाधव आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना क्षिरसागर म्हणाल्या की, स्थलांतरित झालेले विद्यार्थी कसे शिकतील व त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करावे. ज्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यात आले, त्यांची तपासणी करावी, असेही त्या म्हणाल्या. गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत म्हणाले की, शिक्षण विभागाला जेवढी मदत होईल, तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत शाळांना पाणीपुरवठा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिका-र्यांनी स्थलांतरित विद्यार्थ्यांबाबत माहिती देऊन स्थलांतरित विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षण हमी कार्डची नोंद सरल पोर्टलवर घेण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी गटसमन्वयक शेनफड नेव्हार, विषय साधनव्यक्ती चंद्रशेखर देशमुख यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाºया सिरसगाव मंडप व भिवपूर शाळेतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी संदीप देशमुख, मुख्य लिपिक विजय सोनवणे, सिद्धेश्वर बोर्डे, शब्बीर शेख, विशेष शिक्षक संदीप कळम, ज्ञानेश्वर गोराडे, दिलीप जंजाळ आदींनी परिश्रम घेतले.