परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या सातोना (खू) व आंबा ग्रामपंचायतीत सत्ता पालट झाली आहे. तर वाटूर येथे विद्यमान सरपंचाचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतची मत मोजणी जवाहर नवोदय विद्यालय (आंबा) येथे पार पडली. दहा टेबलवर १३ फेºयात ही मत मोजणी पूर्ण झाली. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निकाल जहिर होताच कार्यकर्ते जल्लोष करून गुलाल उधळत होते. ही मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी रूपा चित्रक यांनी सांगितले. यावेळी शिकाऊ पोलीस अधीक्षक हसन गौर, सपोनी. शैलेंद्र ठाकरे, पोउनी. सुनील बोडखे, के. एस. अंंभुरे आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यात सर्वात मोठ्या सातोना (खू), आंबा व वाटूर या ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सूकता ग्रामस्थांना अधिक होती. सातोना (खू) ही ग्रामपंचायत काँग्रेसचे महेश आकात यांच्या ताब्यात होती. मात्र, या निवडणूकीत भाजपचे विलास आकात यांच्या पॅनलचे १५ पैकी १२ उमेदवार तर विद्यमान सरपंच महेश आकात यांच्या पॅनलचे केवळ तिनच सदस्य निवडून आले. आंबा येथे भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला. जुन्या नेत्यांनी आघाडी करत ही ग्रमपंचायत भाजपच्या ताब्यातून हिसकावली आहे. वाटूरची ग्रामपंचायत काँग्रेसचे बद्रीनारायण खवणे यांच्या ताब्यात होती. यावेळीही त्यांनी व्यवस्थित खेळी खेळत १३ पैकी आपले ९ उमेदवार निवडून आणत आपले वर्चस्व या ग्रामपंचायतवर सिद्ध केले आहे. हातडी व का-हाळा या दोन ग्रामपंचायतीत प्रत्येकी ९ पैकी सर्वच सदस्य रा.काँ. चे आले आहेत.
महाविकास आघाडीला मोठे यश- सुरेशकुमार जेथलिया
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सेना मिळून मोठे यश मिळाले आहे. या निवडणुका गावपातळीवर असल्याने सर्वच पक्षाचे सदस्य कमी- अधीक प्रमाणात असतात. आमच्या आघाडीच्या ताब्यात जवळपास २३ ग्रा. पं. आल्या असल्याचेही जेथलिया यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या ताब्यात १५ ग्रामपंचायती
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात म्हणाले, आमच्या ताब्यात १५ ग्रामपंचायती आल्या आहेत. प्रथमत: आमच्या पक्षाला ग्राम पातळीवर मोठे यश मिळाले आहे. यातून तालुक्यात युवकांची ताकद वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही सभापती आकात म्हणाले.
भाजपाच्या ताब्यात ३१ ग्रामपंचायती
युवा नेते राहुल लोणीकर म्हणाले, या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. ३१ ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या आहेत. हा विजय माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकास कामासह आमच्या कार्यकर्त्यांचा आहे,
फोटो ओळ : परतूर येथील मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रतिनीधींमध्ये जाण्यासाठी अशा रांगा लागल्या होत्या. २) मतमोजणी केंद्राबाहेर उभा असलेले कार्यकर्ते.