जाफराबाद येथे प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
जाफराबाद : आगामी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी कर्मचारी दीपक आढावे, अक्षय वाकडे, गजानन चिंचोले, संजय गौतम, राजेंद्र हेलगट, वसंत मुळे आदींची उपस्थिती होती. या मतदार याद्यांवर कोणाला काही आक्षेप असतील तर ते मुदतीत नोंदवावेत, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भारज येथील कीर्तन कार्यक्रमास प्रतिसाद
जाफराबाद : तालुक्यातील भारज येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास प्रतिसाद मिळाला. यादरम्यान हभप रमेश महाराज वाघ यांचे कीर्तन झाले. वाघ यांनी विविध दाखले देत भाविकांचे प्रबोधन केले. माणसाच्या संसारात वित्त असेल तर त्याचा संसार चांगला चालतो. परमार्थात चित्त लागते. ज्यांचे चित्त परमार्थात असेल त्याचे जीवन सफल होते, असा उपदेशही त्यांनी दिला.
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी
जालना : रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर हरभरा खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी नाफेडच्यावतीने ऑनलाईन पोर्टलवर हरभरा नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमरे यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रियेची माहितीही दिली जाणार आहे.
वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांची गैरसोय
जालना : शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मुख्य बाजारपेठेत अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. याचा सर्वाधिक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.