जालना : स्कुटीवरून जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करून तिच्या घरासमोर थांबून मोठमोठ्याने गाणे लावून मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आसिफ शेख फारूख शेख ऊर्फ शाहरुख (जवान, एसआरपी ग्रुप) याच्याविरुद्ध सदर बाजार पाेलीस ठाण्यात २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याला पकडण्यासाठी सदर बाजार पोलीस एसआरपीमध्ये गेले होते. परंतु, तो गडचिरोली येथे गेलेला असल्यामुळे त्याला अटक करता आलेली नाही. दरम्यान, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाचा अहवाल त्याच्या वरिष्ठांना पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
मटका लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
जालना : कल्याण मटका लावणाऱ्या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली. नंदकिशोर सीताराम यादव (रा. भीमनगर), शिवलिंगअप्पा छगनअप्पा वीर (रा. अलंकार टॉकीज, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. फुलचंद गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरी करत आहेत. दरम्यान, बसस्थानकासमोरही पोलिसांनी कारवाई केली. याठिकाणी जुगार सुरू होता. याप्रकरणी संजय नारायण चौधरी (रा. लक्कडकोट), कमलकिशोर पुसाराम बंग (रा. जवाहर बाग) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
काळी-पिवळी चालवणाऱ्यावर गुन्हा
जालना : जालना शहरातील भोकरदन नाका ते बसस्थानक मार्गावर भरधाव काळी-पिवळी चालविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश सुभाष डोळसे (मानदेऊळगाव, ता. बदनापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी तपासणी केली असता, आरोपीकडे वाहनाची कागदपत्रेही आढळून आली नाहीत. अधिक तपास पोलिस नाईक घुगे करीत आहेत.
वंचित बहुजन आघाडीची बैठक
जालना : बदनापूर येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख दीपक डोके, विलास पाचरणे, ॲड. कैलास रत्नपारखे, खालेद चाऊस, तुकाराम हिवराळे, रवीराज वाहूळे आदींची उपस्थित होती. यावेळी बदनापूर नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. याबैठकीस काजी जाफरमिया, अंकुश वेताळ, सिध्दार्थ साबळे, भारत रगडे, इम्रान पठाण, राहुल खंडागळे, राहुल निरंजन चाबुकस्वार आदींची उपस्थिती होती.
जवानावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
जालना : भांडण सुरू असताना वाईट हेतूने महिलेचा हात धरल्याप्रकरणी एसआरपीएफ जवानाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नितीन मदन कांबळे (जवान एसआरपीएफ, जालना) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भताने करीत आहेत.