टेंभुर्णी : इतर निवडणुकींपेक्षा ग्रामपंचायतीची निवडणूक थोडी वेगळी असते. ही निवडणूक गावपातळीवर लढली जात असल्याने यात अधिकाधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. यासाठी कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कर्तव्य पार पाडताना कुठलाही हलगर्जीपणा न करता आपले कर्तव्य काळजीपूर्वक पार पाडावे, असे आवाहन भोकरदनच्या उपविभागीय अधिकारी अंजली कानडे यांनी केले.
जाफराबाद तहसीलअंतर्गत ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा बुधवारी पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार केशव डकले, गटशिक्षणाधिकारी जिनेंद्र काळे, तालुका कृषी अधिकारी शेराण पठाण आदींची उपस्थिती होती. मतदान यंत्र व इतर सिलिंग प्रक्रियेसह महत्त्वाचे प्रपत्र कसे भरावे याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणानंतर आपल्या मनात कुठलीही शंका राहणार नाही, असे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सतीश सोनी यांनी केले. यावेळी मास्टर ट्रेनर शेख जमीर यांनी मतदान केंद्राध्यक्षासह मतदान अधिकाऱ्यांच्या कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर मास्टर ट्रेनर अरुण आहेर व जे. आर. शेख यांनी मतदानयंत्राचे सिलिंग व इतर बाबींचे प्रात्यक्षिक दाखविले व कर्मचाऱ्यांकडून ते करवून घेतले. प्रशिक्षणासाठी झोनल ऑफिसरसह मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर प्रा. दत्ता देशमुख, संजय निकम, सुनील अंभोरे, धनंजय मुळे, एन. डी. देशमुख, बी. एन. वनवे, ए. डी. इतादे, जे. आर. शेख, एस. एस. भुसारी आदींनी पुढाकार घेतला.
कॅप्शन : जाफराबाद येथे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी अंजली कानडे. मंचावर तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार केशव डकले आदी. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित प्रशिक्षणार्थी.