फोटो ओळी
जालना शहरातील कन्हैयानगर येथील एका गोदामात शिरलेली बस.
जालना शहरातील कन्हैयानगर येथील घटना ; मोठा अनर्थ टळला, प्रवासी सुखरूप
चंदनझिरा (जि.जालना) : औरंगाबाद ते लोणार ही बस भरधाव वेगाने लोणारकडे जात होती. जालना शहरातील कन्हैयानगर येथे आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस एका गोदामात शिरली. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जालना बसस्थानकातून १० प्रवासी घेऊन औरंगाबाद- लोणार (एमएच.१४. बिटी.१९२१) ही बस लोणारकडे भरधाव वेगाने जात होती. जालना शहरातील कन्हैयानगर येथे रस्त्याचे काम सुरू असतानाही चालकाने ट्रकला भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस रस्त्याच्या खाली गेल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस येथील एका गोदामात शिरली. या अपघात कोणीही जखमी झाले नाही. सर्व प्रवाशांना शासकीय रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. हा अपघात इतका भीषण होता की, बसचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ आटोळे हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार सूर्यकांत कदम यांनी दिली.
गोदामाचे मोठे नुकसान
बसचालकाने निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने बस चालवून गोदामाचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी गोदामाचे मालक प्रकाश हेमनदास दुसेदा (रा. नाथबाबा गल्ली, जालना) यांच्याफिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात गोदामाचे जवळ तीन लाख २१ हजार रूपयांचे नुकसान झाले.