पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात २४ पुरूष आणि एका विद्यार्थिंनीचा समावेश आहे.
कोरोना संकटाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. राज्य शासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत असून, ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. जालना जिल्ह्यातही रक्ताचा साठा अतिशय कमी आहे. या अनुषंगाने पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक विलास लोखंडे, उपप्राचार्य अमोल बांडगे, प्राचार्य सुधाकर शिरसाट, प्राध्यापक अर्जुन राजबिंडे, प्राध्यापक मंगेश लोखंडे, प्राध्यापक लक्ष्मण खरात, ज्ञानेश्वर आल्हाट, अनिल लक्कस, विठ्ठल बोडके, वैभव भोरकडे, विनोद देशमुख, कृष्णा आल्हाट आदींनी रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी प्राचार्य राजाराम डोईफोडे, अधीक्षक किशोर वाघ, लक्ष्मण खरात, राजाभाऊ शिंदे, प्राध्यापिका अश्विनी कायंदे, प्राध्यापिका स्वरांजली जंगले आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी
पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात येथे शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर.