लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पोलीस दलात कर्तव्य बजावताना होणारी कसरत आणि त्यातच दैनंदिन अभ्यासाचे केलेले नियोजन यामुळेच संभाजी खाडे यांनी ‘एमपीएससी’ने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील रहिवासी असलेले संभाजी खाडे यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. बारावीनंतर त्यांचा डी. एड्.ला प्रवेश घेतला. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून बी. ए.ची पदवी मिळवली. २०११ साली ते नोकरीच्या शोधात औरंगाबादेत गेले. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्यानंतर २०११मध्ये जालना जिल्हा पोलीस दलामध्ये खाडे यांची नियुक्ती झाली. भोकरदन पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासाचे नियोजन केले. दैनंदिन कर्तव्य पार पाडून ते आठ तास अभ्यास करायचे. दोनवेळा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षा दिली. परंतु, मुख्य परीक्षेत अपयश आले. मात्र, त्यानंतरही खचून न जाता खाडे यांनी त्याच जोमाने अभ्यास केला व २०१७मध्ये पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेत ३००पैकी २५० गुण मिळवत यश संपादन केले. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि खाडे हे राज्यातून ७२ रँकने पोलीस उपनिरीक्षकपदी निवडले गेले. या प्रवासात कुटुंबातील सदस्यांसह मार्गदर्शक आणि मित्रांची मोलाची मदत झाल्याचे खाडे यांनी सांगितले.
दुखापतीवर केली मात
२०१७मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणी देणे बाकी होते. त्याचवेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी रनिंग करण्यास मज्जाव केला होता. परंतु, पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी खाडे यांनी नियमित सराव करून शारीरिक चाचणीत १००पैकी ९७ गुण मिळवले.
मुलांना मोफत मार्गदर्शन
२०१८ची परीक्षा झाल्यानंतर खाडे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी भोकरदन शहरातील मुलांसाठी मोफत सरस्वती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. याचा या परिसरातील मुलांना मोठा लाभ होत आहे.
फोटो कॅप्शन : पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवणारे संभाजी खाडे यांचा सत्कार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. यावेळी आमदार नारायण कुचे, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, आदी उपस्थित होते.
फोटो