रस्त्यावर खड्डे
जालना : तालुक्यातील सोमनाथ जळगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
थंडी वाढल्याने टेंभुर्णी परिसरात गहू जोमात
जाफराबाद : परिसरामध्ये मागील आठवड्यापासून थंडीचा जोर हळू वाढू लागल्याने गव्हाचे पीक जोमात आले आहे. गव्हासाठी थंडी पूरक असल्यामुळे वातावरणातील थंडी रब्बीतील गव्हासाठी लाभदायक ठरत आहे. यामुळे गव्हाचे पीक बहरात आले आहे. प्रारंभीच्या काळात पेरणी झालेल्या गव्हाची सोंगणी परिसरात सुरु झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली.
विस्कळीत वीजपुरवठा; शेतकऱ्यांची गैरसोय
जालना : सध्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यात विजेअभावी शेतातील पिकांना पाणी देतानाही शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. विशेषत: सतत खंडित स्वरूपाचा वीजपुरवठा होत असल्याने अधिकची गैरसोय होत आहे. रात्रीच्यावेळीही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी होत आहे.
कापसाची आवक घटल्याने खरेदीला ब्रेक
परतूर : गेल्या आठवड्यापासून कापसाची आवक कमी झाल्याने खरेदीला ब्रेक लागला आहे. आवकच घटल्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी बुधवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर. आर. लिपणे यांनी दिली. दोन आठवड्यापूर्वी चार ते पाच हजार क्विंटल कापसाची आवक सीसीआयकडे होती.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याची मागणी
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्ता अपघातात वाढ झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
पुरोहित संघातर्फे गोरंट्याल यांचा सत्कार
जालना : आमदार कैलास गोरंट्याल यांची कॉंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल आमदार गोरंट्याल यांचा पुरोहित संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष विनायक फुलंब्रीकर, राजेश सामनगावकर, गणेश पांडे, शंभू मांडे आदींची उपस्थिती होती.
समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन
जालना : मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी झाले. यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, नगरसेवक विष्णू पाचपुले, संजय देठे, अरविंद देशमुख, नगरसेवक जंयत भोसले हे उपस्थित होते.