जालना : कारमध्ये सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्यास चंदनझिरा पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी रात्री चंदनझिरा परिसरात करण्यात आली.
तुकाराम अरुण अंभोरे (रा. सेलगाव, ता. बदनापूर) असे आरोपीचे नाव आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी रात्री गस्तीवर होते. चंदनझिरा भागात एका कारला (एमएच २१ एएक्स ०१७८) पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु चालकाने भरधाव कार पुढे नेली. पाेलिसांनी कारचा पाठलाग करून कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये सेंट्रिंगच्या १३ लोखंडी प्लेटा मिळून आल्या. चौकशीदरम्यान तुकाराम अंभोरे याने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, कांबळे, गुसिंगे, साई पवार, मच्छिंद्र निकाळजे, आर. जाधव, अनिल काळे यांच्या पथकाने केली.
चौकट
कारच्या काळ्या फ्रेमचा वापर
शहर व परिसरातील विविध ठिकाणच्या सेंट्रिंगच्या कामावरील लोखंडी वस्तू चोरी केल्यानंतर तो कारमध्ये ठेवत होता. कारला काळ्या फ्रेम असल्याने बाहेरून आतील काही दिसत नव्हते. त्यामुळे कोणाला चोरीचा संशय येत नव्हता; परंतु रात्र तुकाराम अंभोरे हा चंदनझिरा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
फोटो