देळेगव्हाण : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील अंगणवाडीची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या धोकादायक इमारतीला गळती लागत आहे. अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाल्याने पर्यायी व्यवस्था करून संबंधितांना काम करावे लागत आहे.
लहान मुलांना शाळेची गोडी लागावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी डोणगाव येथील अंगणवाडीतील सेविकांसह कर्मचारी प्रयत्न करतात; परंतु मागील काही वर्षांपासून येथील अंगणवाडीच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून, पावसाळ्यात चक्क सर्वत्र गळती लागते. शिवाय येथील पत्रेही खराब झाले आहेत. अंगणवाडीच्या परिसरातही अस्वच्छता पसरली आहे. येथील एका अंगणवाडीच्या छताचे पत्रे उडाल्याने ती पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. तर दुसऱ्या खोलीचे बांधकाम गेल्या दहा वर्षांपासून पूर्ण झालेले नाही. उद्घाटनापूर्वी या इमारतीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. दोन्ही अंगणवाडींचा वापर होत नसल्याने मुलांसह कर्मचाऱ्यांची फरपट होत आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचा आसरा घेण्यात येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पालक करीत आहेत.
कोट
गावातील अंगणवाडी, बालवाडी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच अंगणवाडीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.
-कल्पना पुंगळे, सरपंच, डोणगाव