------------------------------------------
कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस रस्त्यावर
जालना : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने २२ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मुभा दिली आहे. सकाळी ११ वाजेनंतर लगेचच पोलिसांची सायरन असलेली गाडी शहरातून फिरून नागरिकांना सतर्क करते. यानंतर विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवून लगेचच त्यांची अँटिजन चाचणी केली जात आहे. या भीतीने अनेक विना काम फिरणाऱ्यांची संख्या घटली आहे.
जालना येथील कदीम जालना, तालुका जालना तसेच सदरबाजार आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याअंतर्गत बरीच सतर्कता राखली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी आतापर्यंत एक लाख रूपयांपेक्षा अधिकचा दंड केला आहे. तर जे दुपारी बारा वाजेनंतर फिरताना दिसून येत आहेत, त्यांना अडवून प्रथम कारण विचारले जात आहे. हे कारण सबळ वाटल्यास त्यांना जाऊ दिले जात आहे. तसेच मोकाट फिरणाऱ्यांची अडवणूक करून लगेचच त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली जाते. ही माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक अँटिजेन चाचणीचे किट घेऊन हजर होतात. आतापर्यंत जवळपास ६० पेक्षा अधिक जणांची चाचणी केली असून त्यातील १४ जण पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले. या सर्व पॉझिटिव्ह संशयितांची रवानगी ही कोविड केअर सेंटरमध्ये केली जात असल्याचे सांगण्यात आले.
बंदच्या काळात कामगारांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. तसेच कामगारांकडे कंपनीचे ओळखपत्र आणि गणवेश असल्यास फारशी चौकशी केली जात नाही. त्यातच अनेकजण हे वैद्यकीय कारण देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासणी मोहिमेत पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, यशवंत जाधव, कदीम ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन, तालुका जालनाचे निरीक्षक देविदास शेळके हे संपूर्ण शहर पिंजून काढत असल्याने रस्त्यावरील गर्दी ओसरली आहे.