दोन किडन्या झाल्या होत्या निकामी; गावातून होतेय हळहळ व्यक्त
वालसावंगी : दोन्ही किडनी निकामी झाल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या वालसावंगी येथील १५ वर्षीय अजय आहेर याचा बुधवारी मृत्यू झाला. अजय आई-वडिलांना एकुलता एक असल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजय कैलास आहेर हा वालसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. दीड वर्षांपूर्वी त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्याला जास्त त्रास्त होत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारासाठी मोठा खर्च येणार होता. परंतु घरची परिस्थिती हालाखीची असल्याने वडील चिंतेत होते. ही बाब नातेवाईक व गावकऱ्यांना समजली असता ग्रामस्थांनी गावात मदत फेरी काढून पैसे गोळा केले. जमा झालेले पैसे त्याच्या वडिलांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर त्याची तब्येतही सुधारली होती. परंतु, बुधवारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.