शेतकऱ्यांना वाढीव कर्जमाफीची प्रतीक्षा
जालना : शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ केले आहे. या कर्जमाफी प्रक्रियेत अद्याप अनेक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. जिल्ह्यातील दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वाढीव कर्जमाफीच्या घोषणेची प्रतीक्षा कायम आहे. शासनाने यापूर्वी दिलेल्या संकेतामुळे दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी होईल, अशी आशा अनेक शेतकऱ्यांना आहे.
टेंभुर्णी येथील हमीद शेख यांचा सत्कार
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील लाइनमन हमीद शेख यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा प्रजासत्ताक दिनी सहायक अभियंता अनिल डुकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोरोनाच्या काळात ग्राहकांना अधिकाधिक सुरळीत सेवा पुरविण्यासाठी शेख यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला.
बसअभावी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
घनसावंगी : लॉकडाऊन शिथिलतेनंतर प्रारंभी नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांमुळे गजबजल्या आहेत, परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तरी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.