जालना : गत दोन वर्षात जिल्ह्यातील तब्बल ८५० जणांना सर्पदंश झाला आहे. त्यात गतवर्षी एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या शासकीय रूग्णालयातील आकडेवारी व्यतिरिक्त सर्पदंशाने गंभीर जखमी झालेले रूग्ण खासगी रूग्णालयातही उपचार घेतात.
जिल्ह्यात विविध प्रजातीचे साप आढळतात. शहरी, ग्रामीण भागातही साप आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी साप निघाला की त्याला ठार मारण्याकडे नागरिकांचा अधिक कल होता. परंतु, सर्पमित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे सापाला न मारता सर्पमित्राच्या माध्यमातून त्याला पकडून जंगलात सोडण्याकडे नागरिकांनी अधिक भर दिला आहे. शेतात काम करताना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २०१९ मध्ये ४५७ जणांना सर्पदंश झाला होता. त्यात ऑक्टोबर महिन्यात एका गंभीर रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर चालू वर्षात आजवर सर्पदंश झालेल्या ३९३ नागरिकांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. चालू वर्षात वेळेवर उपचार मिळाल्याने एकाही जखमीचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात लसीचा साठा किती उपलब्ध?
सर्पदंश झाल्यानंतर जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले जाते. जखमीला देण्यात येणाऱ्या अँटिरेबीज सिरम या इंजेक्शनचा जिल्हा रूग्णालयात मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले.
साप चावताच काय काळजी घ्यावी
सर्पदंश झालेल्या ठिकाणापासून चार ते पाच इंचावर कापडी पट्टीने आवळून बांधावे. त्यामुळे विष शरीरात पसरण्याचा धोका कमी होतो. सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. सर्पदंश झाल्यानंतर खाण्यास किंवा पिण्यास काहीही देऊ नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चक्कर येऊ शकते आणि वेदनाही खूप होतात. त्यामुळे डॉक्टरांकडे नेण्यापर्यंत जखमी व्यक्तीला शक्यतो एकटे सोडू नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
जिल्ह्यात आढळणारे साप
जालना जिल्ह्यात विषारी, बिनविषारी असे जवळपास २४ जातीचे साप आढळतात. त्यात मन्यार, नाग, घोणस, फुरसे, पवळा हे विषारी जातीचे साप आढळतात. मांजऱ्या, धामण, तस्कर, दिवड, कवड्या हे बिनविषारी साप आढळतात. नागरिकांनी सापला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. सर्पमित्र नाग पकडून जंगलात नेऊन सोडतील, असे आवाहन सर्पमित्र शेख फरीद यांनी केले आहे.
दोन वर्षातील घटना
२०१९ -२०२०
जानेवारी ०८ १९
फेब्रुवारी ०८ २२
मार्च १७ २३
एप्रिल १४ १९
मे १४ ०५
जून ४४ ३५
जुलै ९७ ६८
ऑगस्ट ९८ ५०
सप्टेंबर ५५ ५१
ऑक्टोबर ४७ ५७
नोव्हेंबर ३१ २७
डिसेंबर २४ १७