शेतकऱ्यांमधून समाधान : जुई धरणातील कालव्याद्वारे पाणी
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातील डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रबी पिकांसाठी मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा ६०० हेक्टरवरील रबी पिकांना फायदा होणार आहे.
डाव्या कालव्याद्वारे एक ते चार नंबर आउट लाइट तर उजव्या कालव्याद्वारे नऊ नंबर आउट लाइटपर्यंत हे पाणी सोडण्यात आले आहे. यापुढे दहा ते बारा दिवस हे पाणी सुरू राहणार आहे. यानंतर २० ते २५ दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा दुसरे पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन जुई धरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रबी पिकांसह उन्हाळी पिकाचे नियोजन करता येणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीत या धरणात भोकरदन शहर, दानापूर, सुरंगळी, करजगाव, कल्याणी, वाकडी, कुकडी, आव्हाना, कठोरा बाजार, मूर्तड, वरुड, पिंपळगाव (रे.), देहेड, भायडी, तळणी, दगडवाडी, विरेगाव, बाभूळगाव, सिपोरा बाजार या गावांसाठी राखीव पाणीसाठा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तरवार यांनी दिली. कालव्याला पाणी सोडताना के. वाय. गायकवाड, पी. डी. गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य सुदाम देठे, सोनुने, गायकवाड आदींची उपस्थिती होती.