लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त ५१ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यासाठी ५ बसेस तर इतर शहरांसाठी ४६ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शनिवारी जालना बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली.दिवाळी सणानिमित्त विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दि. २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे-जालना या मार्गावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, या कालावधीत नियमित बसेस व्यतिरिक्त ५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.विभागामधील सर्व आगार व्यवस्थापकांना सदर कालावधीत प्रवाशांसाठी जालना बसस्थानकावरून विविध मार्गांवर जादा बसगाड्या सोडण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासह नागपूर, सुरत, लातूर, कुर्ला, पंढरपूरसाठीही जादा फेऱ्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.तरी सदर बसेसच्या अधिक माहितीकरिता जालना बसस्थानक येथे संपर्क साधावा, तसेच प्रवाशांनी अवैध प्रवाशी वाहनातून प्रवास न करता बसने प्रवास करावा, असे आवाहन जालना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी बसस्थानकात गर्दी दिसून आली.
दिवाळीनिमित्त ५१ जादा बसेस सोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:37 IST