प्रभाकर शेळके यांना एकता साहित्य पुरस्कार
जालना : शहरातील कवी तथा कथाकार डॉ. प्रभाकर शेळके यांना डॉ. विश्वनाथ यादव कराड गुरूजींच्या नावे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह व्यवस्थेचा बदला एकता पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर, संयोजक अनंत कराड, नाट्यलेखक राजकुमार तांगडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरूच
जालना : महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी मोहीम राबिवली जात आहे. ग्राहकांना वीजबिल भरता यावे, यासाठी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. ग्राहकांना क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, मोबाईल वॅलेट आदींचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कबड्डी संघाची मंगळवारी निवड
जालना : जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुमार, कुमारी गटाच्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जिल्हा संघाची मंगळवारी निवड चाचणी होणार आहे. बदनापूर येथील चैतन्य इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ही निवड चाचणी होणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव राजेश राऊत यांनी दिली.
पारध येथील पोलीस ठाण्यात तपासणी
पारध : येथील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी पोनि. रमेश जायभाये, सुरेश पडोळ, सुरेश पालकर यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.