जालना : जिल्ह्यातील ४५०९ नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेहाची लागण झाल्याचे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत समोर आले आहे. जिल्ह्यातील एक लाख ७३ हजार ५४७ जणांची तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.
धावपळीच्या युगात वयाची तिशी ओलांडल्यानंतरच उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजाराने युवकांना ग्रासण्यास सुरूवात केली आहे. या आजारामुळे त्रस्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने वयाची ३५ वर्षे ओलांडणाऱ्या महिला, पुरुषांची राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत तपासणी केली जात आहे. अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत औषध पुरवठा केला जात आहे.
सन २०२०-२१ या वर्षात रुग्णांचा शोध घेऊन आयटी सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाईन माहिती भरण्यासाठी जवळपास साडेतीन लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आले होते. यापैकी जवळपास एक लाख ७३ हजार ५४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील २९८२ नागरिकांना उच्च रक्तदाब, तर १५२७ जणांना मधुमेहाचा त्रास असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या वतीने मोफत औषधांचा पुरवठा केला जात आहे.
कॅन्सरचे नऊ रुग्ण
या तपासणी अंतर्गत जिल्ह्यात कॅन्सरचे ९ रुग्ण आढळून आले आहेत. यात मौखिक कॅन्सरचे ८, तर स्तनाच्या कॅन्सरचा एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांवरही तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत.
जालना, घनसावंगी तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण
या तपासणी मोहिमेत जालना तालुक्यात उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक ७८२ रुग्ण आढळून आले आहेत, तर घनसावंगी तालुक्यात मधुमेहाचे सर्वाधिक ३५८ रुग्ण आढळून आले आहेत. उच्च रक्तदाबाचे तालुकानिहाय रुग्ण पाहता अंबड - २००, बदनापूर - ५८९, भोकरदन - ६५, घनसावंगी - ३३६, जाफराबाद - ३८८, जालना - ७८२, मंठा - ४४२ व परतूर तालुक्यात १८० रुग्ण आढळून आले आहेत. तर मधुमेहाचे रुग्ण पाहता अंबड- २५२, बदनापूर- १७०, भोकरदन- ३५, घनसावंगी- ३५८, जाफराबाद- १७९, जालना २८४, मंठा १७१ व परतूर तालुक्यात ७८ रुग्ण आढळून आले आहेत.
२१३ टॅबचे वाटप
नागरिकांची तपासणी करून त्यांची आयटी सॉफ्टवेअरवर नोंद करण्यासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २१३ टॅब वाटप करण्यात आले आहेत. तपासणीनंतर आढळून येणाऱ्या रुग्णांची माहिती तत्काळ या टॅबद्वारे ऑनलाईन संकलित केली जात आहे.
कोट
असंसर्गजन्य कार्यक्रमांतर्गत ३५ वर्षे वयावरील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत आणि मोफत उपचार केले जाणार आहेत. आयटी सॉफ्टवेअरद्वारे ही माहिती ऑनलाईन भरली जात आहे. तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे
उच्च रक्तदाब, मधुमेहाचा आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करणे, सकस आणि वेळेवर आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, व्यसनापासून दूर राहणे, वाढते वजन नियंत्रणात ठेवणे, गोड पदार्थ कमी प्रमाणात घेण्यावर भर देणे गरजेचे आहे. काही शारीरिक त्रास असतील तर घरगुती उपचार न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणेही गरजेचे आहे.