गोंदी : अंबड तालुक्यातील घुंगर्डे-हदगाव येथील एका धाब्यावर सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गोंदी पोलिसांनी छापा टाकून ३० हजार ९८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अंबड तालुक्यातील घुंगर्डे-हदगाव येथील एका धाब्यावर अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना मिळाली. या माहितीवरून सदरील ठिकाणी शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. धाब्याची झाडाझडती घेतली असता, एका दुचाकीच्या डिक्कीमध्ये देशी दारूच्या १९ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपी रामभाऊ विठ्ठल थोरात याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून दुचाकीसह ३०९८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉस्टेबल अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून रामभाऊ थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, अंकुश दासर, अभिजित निकम, अविनाश पगारे, महेश तोटे, होमगार्ड अनिरुद्ध मिरकड यांनी केली.