टेंभुर्णी : ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरताना सोबत ग्रामपंचायतीचे बेबाकी प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सध्या ग्रामपंचायत कार्यालयात कर भरणा करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी ग्रामपंचायतीकडून ३० हजारांची कर वसुली झाली आहे.
टेंभुर्णी ग्रामपंचायतीत सध्या इच्छुक उमेदवार कर भरणा करण्यासाठी गर्दी करीत आहेत. एरवी वर्षानुवर्षे कर न भरणारेही स्वत:हून कर भरण्यासाठी ग्रामपंचायतीचा उंबरठा चढत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २३ तारखेपासून आवेदनपत्र भरण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर टेंभुर्णी ग्रामपंचायतीत मागील दोन दिवसांत घरपट्टी, नळपट्टी आदी कराच्या रूपातून जवळपास ३० हजार रुपयांचा भरणा झाल्याचे ग्रामविकास अधिकारी सुखदेव शेळके यांनी सांगितले. या माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक कर वसूल होईल, असा अंदाज शेळके यांनी वर्तविला आहे.
कुठल्याही परिस्थितीत आपला अर्ज बाद होणार नाही याची काळजी उमेदवार घेत आहेत. त्यासाठी आवेदनपत्रासोबत जोडावयाची सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासली जात आहे. यात ग्रामपंचायतीचे बेबाकी प्रमाणपत्र जोडावे लागत असल्याने सर्वप्रथम प्रत्येक उमेदवार ग्रामपंचायतीत जाऊन आपला हिसोब चुकता करीत आहेत. टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी जवळपास ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या माध्यमातून ग्रामपंचायतीची मोठी थकीत कर वसुली होण्यास मदत होणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी भागमभाग
आरक्षित जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र किंवा फाइल दाखल केल्याची पोहोच पावती आवेदनपत्रासोबत जोडावी लागणार आहे. यामुळे सध्या जात वैधता प्रमाणपत्र फाइल दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अनेक उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.