लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटी लि.च्या मुख्य शाखेतून ३ लाख रूपये घेऊन दुस-या शाखेत जाणा-या दोन कर्मचाऱ्यांना दुचाकीस्वार चौघांनी मारहाण करून लुटले. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी जालना शहरातील नवीन मोंढा भागात घडली असून, जखमी कर्मच-यांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.जालना येथील बडी सडक रोडवर बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटी लि.ची मुख्य शाखा आहे. या सोसायटीच्या मोंढा शाखेतील कर्मचारी गणेश कागणे व अरविंद देशमुख हे सोमवारी सकाळी मुख्य शाखेत गेले होते. मुख्य शाखेतून ३ लाख रूपयांची रोकड घेऊन ते दोघे दुचाकीवरून दुस-या शाखेत जात होते. त्यांची दुचाकी नवीन मोंढा भागातील मारूती मंदिराजवळ आली असता दुचाकीस्वार चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाखाची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि. शामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांच्या शोधार्थ विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पतसंस्था कर्मचा-यांना मारहाण करून लुटणारे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला असून, लवकरच ते चोरटे सापडतील, असे पोलिसांनी सांगितले.
पतसंस्था कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:18 IST