महाकाळा (अंकुशनगर) : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागील २४ दिवसांपासून ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १४ फेबुवारी रोजी गावागावात ग्रामपंचातींसमोर ठिय्या आंदोलन केले जाणार असून, यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागील २४ दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासनाने लक्ष द्यावे, यासाठी आंदोलनकर्त्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. कधी अन्नत्याग तर कधी साखळी उपोषण, घरा-घरात जाऊन आरक्षणाची जनजागृती करणे, दुचाकी रॅली काढणे आदी उपक्रम राबविले जात आहे. या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा येथून १०१ चारचाकी गाड्या आल्या होत्या. असे असतानाही सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नाही. सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आता १४ फेब्रुवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असून, यासाठी शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत गावागावात जनजागृती केली जात आहे. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत चकलांबा, खळेगाव, पवळाचीवाडी, देवपिंपरी, माटेगाव, उमापूर, गेवराई येथे जनजागृती केली जात आहे.