जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. शुक्रवारीच २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ४४ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार १८९ वर गेली असून, आजवर ३५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १२ हजार ५८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा तालुक्यातील पांगरी वायाळ येथील १, तर परतूर शहरातील एकास कोरोनाची बाधा झाली. भोकरदन शहरातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर औरंगाबाद शहरातील २, बुलडाणा येथील ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात १९,२४३ जण संशयित आहेत. शुक्रवारी ३८१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २२ जण पॉझिटिव्ह आले असून, २७८ स्वॅबाचे अहवाल येणे बाकी आहे. भोकरदन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील अलगीकरण कक्षात दोघांना ठेवण्यात आले आहे.