भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. धान्य वाटप न झाल्याने दुकानदार आणि लाभार्थींमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ व एक किलो डाळ वाटप करण्यात येत होती. या योजनेची मुदत नोव्हेंबर २०२० होती. मात्र, तालुक्यातील २०८ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी १४१ दुकानदारांना या योजनेंतर्गत मोफत योजनेचा उपलब्ध झालेला १० ते १२ हजार क्विंटल माल मिळाला. संबंधित दुकानदारांनी लाभार्थींना मालाचे वितरण केले. मात्र, ६७ दुकानदारांचा माल मुदतीच्या आत आला नाही. त्यामुळे त्यांनी लाभार्थींना वाटप केला गेला नाही. तालुक्यातील आलापूर, वालसा वडाळा, नळणी बु., तडेगाववाडी, तडेगाव, तळेगाव, बोरगाव तारू, वजीरखेड, मुठाड, वाडी बु., भोरखेड, कठोरा बाजार, सुरंगळी, टाकळी हिवरडी, सिरजगाव मंडप, चिंचोली, वाकडी, कोठा जहागीर, माळेगाव, भोकरदन, चोऱ्हाळा, लेहा, बरंजळा लोखंडे, देऊळगाव ताड, हसनाबाद, तळणी, आन्वा, मासनपूर, जळगाव सपकाळ, हिसोडा खु., हिसोडा बु., कोठा कोळी, पिंपळगाव रेणुकाई, सावंगी अवघडराव, रेलगाव, मोहळाई, वडशेद, पारध खु., पद्मावती, मानापूर, पाळसखेड पिपळे, केदारखेडा, चांदई एक्को, लोणगाव, निमगाव, दहीगाव, पोखरी, बोरगाव तारू, मेहेगाव, वाढोना, जयदेववाडी, गोकुळ या गावांतील तब्बल २० हजार लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा गहू, तांदूळ व डाळ मिळाली नाही. मात्र, शेजारच्या गावांतील दुकानदाराने मोफत धान्य वाटप केले. मग आपल्या गावात का वाटप केले नाही ? अशी तक्रार लाभार्थी करीत आहेत. शिवाय काही ठिकाणी मोफत धान्य मिळत नसल्याने वादही निर्माण झाले आहेत.
माल आल्यानंतर वितरण
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अर्धवट माल मिळाला होता. जेवढा माल मिळाला होता तो स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आला. त्यांनी ही तो लाभार्थींना वाटप केला. मात्र, त्यानंतर या योजनेची मुदत संपल्यामुळे जिल्ह्यात माल आलाच नाही. त्यामुळे ६७ दुकानदारांना मोफत योजनेचा माल देण्यात आला नाही. मात्र, मुदतवाढ मिळाल्यानंतर माल येईल व त्यानंतर या दुकानदारांना योजनेचा माल देण्यात येईल.
संतोष गोरड,
तहसीलदार, भोकरदन
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा माल जिल्ह्यातील अर्ध्या दुकानदारांना मिळाला. त्यांनी तो लाभार्थींना वाटप केला आहे. मात्र, ज्या दुकानदाराला मालच मिळाला नाही तरीसुद्धा त्याच्याकडे लाभार्थी मालाची मागणी करीत अहेत. शिवाय त्याला दोषी धरत आहेत. त्यांना लाभार्थींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. या योजनेचा माल मिळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देऊन गरजू नगरिकांना लाभ द्यावा.
जगन्नाथ थोटे
अध्यक्ष, जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना