धावडा : धावडा येथील विद्युत उपकेंद्रावर अधिक भार वाढल्याने उपकेंद्रातील मोठा ट्रान्सफार्मर जळाल्याने यावरील जवळपास १३ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन वर्षांची दुष्काळाची कसर यावर्षी पाऊस मुबलक असल्याने निघण्याची आशा शेतकऱ्यांना असताना सध्या परिसरातील शेतकरी गहू, हरभरा, मका, भाजीपाला, शाळू ज्वारी इ. रबी पिकांना पाणी देण्यात व्यस्त असून, प्रत्येकाने रबीचा पेरा केल्याने सर्वच विद्युतपंपाने पाणी उपसण्यात मग्न आहे. त्यामुळे या उपकेंद्रावर पोखरी, मेहगाव, सुंदरवाडी, प्रतापनगर, वडोदतांगडा, भोरखेडा, वडाळी, टाका, जाईदेव, वाढोणा, वालसावंगी, विझोरा व धावडा ही १३ गावे येतात. परंतु ट्रान्सफार्मर जळाल्यापासून ही गावे ३ नोव्हेंबरपासून अंधारात आहेत. या गावातील शेतकऱ्यांचे रबी पिकाचे पाणी असून विद्युत पुरवठा नसल्याने धोक्यात आली आहेत. मोठा ट्रान्सफार्मरसह येथील बॅटऱ्याही जळाल्या आहेत. ४ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून नवीन बॅटऱ्या आणून बसविण्यात आल्या. जालना येथून तज्ज्ञ बोलावण्यात येऊन त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ट्रान्सफार्मर निकामी झाल्याचे कळले. दुसऱ्या दिवशी ट्रान्सफार्मरची दुरूस्ती करून या उपकेंद्रावरील १३ गावांसाठी ५ फिडरद्वारे चार चार तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु भार जास्तीचा असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत न होता वारंवार खंडित होत आहे. गेल्या चार दिवसांपासून ही गावे अंधारात असून, विजेवरील सर्व उपकरणे, व्यवहार सर्वांवरच याचा परिणाम होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन जास्त क्षमतेचा ट्रान्सफार्मर देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
१३ गावांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: November 8, 2016 00:24 IST