जालना : कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात देखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून, गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील जिल्ह्यातील १२ हजार ५४० नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आवश्यक प्रमाणात नवीन वीज मीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीज जोडण्या देखील ताबडतोब कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीज सेवांप्रमाणेच नवीन वीज जोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील १२ हजार ५४० नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
वीज मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले मीटर तातडीने संबंधित ग्राहकांकडे कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीज मीटर खरेदी करण्याची आता आवश्यकता नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीज जोडणीच्या अर्जासाठी महावितरणच्या ॲपवर ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. त्याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीज जोडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्ज केल्यापासून त्याची मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती पाहण्यासाठी वीज ग्राहकांना ऑनलाइन सोय उपलब्ध आहे.