टेंभुर्णी : पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी टेंभुर्णी गाव व परिसरातील ११ महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात येणार आहे. येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी मंगला धुपे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यावर्षी महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे वाडीवस्तीवर शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे आदर्श कार्य करणाऱ्या परिसरातील ११ शिक्षिकांना वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रशस्त हॉलमध्ये सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील महिला, शिक्षिका व विद्यार्थिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे प्रमुख रावसाहेब अंभोरे यांनी केले आहे.