हुथी बंडखोरांनी केलेल्या हवाई हल्ल्यांना इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले. रविवारी सानाच्या बहुतेक निवासी भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायली हल्ल्यांमध्ये हेझियाज पॉवर प्लांट आणि गॅस स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या हल्ल्यांबाबत इस्रायलकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर पाच हून अधिक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
राष्ट्रपती राजवाडा आणि बंद असलेल्या लष्करी अकादमीसह संपूर्ण शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. राजधानीच्या साबिक चौकाजवळ धुराचे लोट उठताना दिसत होते, असं राजधानी साना येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
साना येथील एका रहिवाशाने सांगितले की, स्फोटाचा आवाज खूप मोठा होता, तो दूरवरून ऐकू येत होता. घर हादरले आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या.
लाल समुद्रात तणाव
पॅलेस्टिनींसोबतचा संघर्ष वाढल्यापासून, हुथी बंडखोर लाल समुद्रात इस्रायलला व्यापाराचे नुकसान करण्यासाठी इस्रायली जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सतत हल्ला करत आहेत.
गेल्या दोन वर्षांत, हुथी बंडखोर लाल समुद्रात व्यापारी माल वाहून नेणाऱ्या जहाजांवर सतत हल्ले करत आहेत. दरवर्षी सुमारे १ ट्रिलियन डॉलर्स किमतीचा माल या मार्गाने जातो. नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान, हुथींनी १०० हून अधिक जहाजांना लक्ष्य केले. यामुळे मोठे नुकसान झाले.
अमेरिका आणि हुथी करार
इस्रायलसोबत वाढत्या तणावानंतर, गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेने हुथींसोबत एक करार केला होता. याअंतर्गत जर त्यांनी लाल समुद्रात हल्ले थांबवले तर त्या बदल्यात अमेरिका हवाई हल्ले थांबवेल. यावेळी हुथींनी स्पष्टपणे सांगितले होते की, ते इस्रायलशी संबंधित लक्ष्यांवर हल्ले करत राहतील.