नेपाळमध्ये आज लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा होत आहे. २७५ सदस्यांच्या प्रतिनिधी सभेसाठी आज मतदान होत असून, संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे ते झापा-५ या मतदारसंघाकडे. येथे नेपाळच्या राजकारणातील 'भीष्म पितामह' मानले जाणारे केपी शर्मा ओली आणि तरुणाईचे 'आयकॉन' असलेले बालेन शाह यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत होत आहे. ही निवडणूक केवळ नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण हे ठरवणार नाही, तर नेपाळच्या राजकारणातील जुन्या पिढीचे अस्तित्व टिकणार की नव्या दमाचे नेतृत्व उदयास येणार, याचाही फैसला करणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बालेकिल्ल्यात घुसून दिले आव्हान!
केपी शर्मा ओली हे नेपाळच्या राजकारणातील सर्वात वजनदार नाव. १९७० च्या झापा विद्रोहातून तावून-सुलाखून निघालेले ओली गेल्या पाच दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. झापा-५ हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो, जिथून त्यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला आहे. मात्र, यंदा या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांनी कंबर कसली आहे. बालेन यांनी कोणत्याही सुरक्षित जागेवरून लढण्याऐवजी थेट ओलींच्या विरोधात मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
कोण आहेत बालेन शाह?
३५ वर्षीय बालेन शाह यांनी कर्नाटक (भारत) मधून एम.टेक केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते नेपाळच्या हिप-हॉप जगातील मोठे नाव होते. २०२२ मध्ये अपक्ष म्हणून काठमांडूचे महापौर पद जिंकून त्यांनी पारंपारिक पक्षांना धक्का दिला होता. जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी महापौर पदाचा राजीनामा देऊन रवी लामिछाने यांच्या 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'मध्ये प्रवेश केला. सध्या ते या पक्षाचे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत.
'Gen Z' मतदारांचा वाढता पाठिंबा
सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये तरुणांच्या प्रचंड आंदोलनामुळे केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि घराणेशाहीला कंटाळलेला हा युवा वर्ग आता बदलाच्या मूडमध्ये आहे. बालेन शाह यांनी आपल्या रॅप गाण्यांमधून आणि थेट कृतीतून याच तरुणाईच्या मनात घर केले आहे. सोशल मीडियावर बालेन यांचे लाखो फॉलोअर्स असून, ही डिजिटल ताकद आता बॅलेट बॉक्समध्ये परिवर्तित होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
ओलींचा अनुभव की बालेनची क्रेझ?
केपी शर्मा ओली यांनी आपल्या प्रचारात प्रामुख्याने राष्ट्रवाद आणि अनुभवावर भर दिला आहे. "देशाची सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अनुभवाची गरज आहे," असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. दुसरीकडे, बालेन शाह यांनी "जुन्या नेत्यांनी नेपाळला केवळ मागे खेचले आहे, आता बदलाची वेळ आली आहे," असा नारा दिला आहे.
निवडणुकीचे गणित
नेपाळच्या २७५ जागांपैकी १६५ जागांवर थेट मतदान होत आहे, तर ११० जागा समानुपातिक पद्धतीने भरल्या जाणार आहेत. बालेन शाह आणि त्यांचा पक्ष आरएसपी सध्या प्रचंड चर्चेत आहे. जर बालेन झापा-५ मध्ये ओलींना पराभूत करण्यात यशस्वी झाले, तर तो नेपाळच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरेल. नेपाळमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. नेपाळच्या या हाय व्होल्टेज लढाईचे निकाल लवकरच स्पष्ट होतील.
Web Summary : Nepal witnesses a crucial election in Jhapa-5, pitting veteran KP Sharma Oli against rising star Balen Shah. This battle determines Nepal's future leadership, testing the old guard against a youth-driven wave for change, fueled by anti-corruption sentiments.
Web Summary : नेपाल के झापा-5 में महत्वपूर्ण चुनाव, अनुभवी केपी शर्मा ओली और उभरते सितारे बालेन शाह के बीच मुकाबला। यह लड़ाई नेपाल के भविष्य के नेतृत्व का निर्धारण करती है, जो भ्रष्टाचार विरोधी भावनाओं से प्रेरित परिवर्तन के लिए पुरानी पीढ़ी का युवाओं द्वारा परीक्षण है।