अफगाणिस्तानात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका महिलांना बसत आहे. अफगाणिस्तानातील कायद्यानुसार, परके पुरुष महिलांना स्पर्श करू शकत नाहीत. या कठोर नियमामुळे बचाव कार्यादरम्यान महिलांना ढिगाऱ्याखालीच सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालिबान शासनातील हा नियम महिलांच्या जीवावर बेतला आहे.
अफगाणिस्तानातील भूकंपामुळे सुमारे २२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र कचरा पसरला आहे आणि लोक त्यांच्या जीवनासाठी संघर्ष करत आहेत.
महिला बचाव कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता
अफगाणिस्तानात महिला बचाव कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे भूकंपग्रस्त महिलांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. ज्या महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत, त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले जात आहे. एवढेच नाही, तर ज्या महिलांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेहही थेट स्पर्श न करता कपड्यांच्या साहाय्याने ओढून बाहेर काढले जात आहेत.
एका पीडित महिलेने सांगितले की, "बचाव कर्मचारी आम्हाला एका कोपऱ्यात जमा करून सोडून देतात आणि त्यानंतर आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. महिलांना मदत करणे तर दूरच, पण त्यांची कोणी विचारपूसही करत नाही.
तहजीबुल्लाह हा महजीब स्वयंसेवक पथकाचा सदस्य आहे. बचाव कार्याबाबत त्यांनी सांगितले की, महिला अदृश्य आहेत. बचाव पथकातील लोक महिलांना अजिबात वाचवत नाहीत. आधी पुरुष आणि मुलांना वाचवले जात आहे. दुसरीकडे, महिला एका बाजूला बसून मदतीची वाट पाहत आहेत. तहजीबुल्लाह म्हणाले की, पुरुष नातेवाईक नसल्यामुळे, अज्ञात बचाव कर्मचारी त्यांना त्यांच्या कपड्यांवरून ओढत आहेत जेणेकरून त्यांना कोणताही स्पर्श होऊ नये.
महिलांची स्थिती वाईट आहे
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीत महिलांना मूलभूत अधिकारांपासूनही वंचित ठेवण्यात आले होते. ज्यावेळी तालिबानने दुसऱ्यांदा अफगाणिस्तानवर राज्य करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी महिलांना अधिक अधिकार देण्याबद्दल बोलले. आतापर्यंत त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. येथे मुली सहावीनंतर शाळेत जाऊ शकत नाहीत.तसेच महिलांना पुरुष साथीदाराशिवाय लांबचा प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यांना अनेक नोकऱ्यांमध्ये संधीही मिळत नाहीत.