Italy PM Giorgia Meloni in CPAC : इटलिच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जागतिक डाव्या राजकारणावर जोरदार टीका केली अन् याला 'डबल स्टँडर्ड' म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली आणि मी स्वत: जागतिक पातळीवर उजव्या चळवळीची निर्मिती आणि नेतृत्व करत आहोत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
शनिवारी (22 फेब्रुवारी) अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन कॉन्फरन्स (CPAC) ला व्हिडिओ लिंकद्वारे संबोधित करताना मेलोनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांची प्रशंसा केली, तर डाव्या विचारसरणीच्या राजकारण्यांवर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने डावे नाराज असल्याचा दावा मेलोनी यांनी केला आहे.
यावेळी मेलोनी यांनी डाव्यांवर डबल स्टँडर्डचा आरोप केला आहे. तसेच, जागतिक पुराणमतवादींना 'लोकशाहीसाठी धोका' म्हणून संबोधल्याबद्दल डाव्या आणि उदारमतवाद्यांवर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यामुळे डाव्यांचा संताप होत आहे. याचे कारण कंझर्व्हेटिव्ह लोकांनी निवडणुका जिंकल्या एवढेच नाही, तर ते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र काम करत आहेत.
मेलोनी पुढे म्हणतात, बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी 90 च्या दशकात जागतिक डाव्या विचारसरणीचे नेटवर्क तयार केले, तेव्हा त्यांना राजकारणी म्हटले जात होते आणि जेव्हा ट्रम्प, मेलोनी, मिली किंवा मोदी बोलतात, तेव्हा त्यांना लोकशाहीला धोका असल्याचे म्हटले जाते, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. आता आपल्याला त्याची सवय झाली आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे, आता लोक त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे आता डाव्यांनी कितीही चिखलफेक केली तरी, लोक आम्हाला मतदान करतच राहतील, असेही मेलोनी यांनी म्हटले.
जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना एक मजबूत नेता म्हणून पाठिंबा दिला आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात रुढीवादी चळवळीत तणाव निर्माण होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली. त्या म्हणाल्या, आमच्या विरोधकांना आशा आहे की, ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेतून हाकलून देतील, परंतु अध्यक्ष ट्रम्प यांची शक्ती आणि प्रभाव पाहता, मी पैज लावेन की, जे लोक विभाजनाची अपेक्षा करत आहेत, ते सर्व चुकीचे सिद्ध होतील.