पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याच्या बातमीने अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात काहीतरी मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या दौऱ्यात त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याआधी ते व्हाईट हाऊसमध्ये आयोजित मेजवानीमध्ये सहभागी झाले होते.
दोन महिन्यांत मुनीर यांचा दुसरा अमेरिका दौरामिळालेल्या माहितीनुसार, जनरल मुनीर या आठवड्यात 'CENTCOM' मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाऊ शकतात. विशेष म्हणजे, दोन महिन्यांच्या आतच हा त्यांचा दुसरा अमेरिका दौरा आहे. याआधीच्या दौऱ्यात त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत रात्रीचं जेवण घेतलं होतं. अमेरिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं होतं की, अमेरिकेच्या अध्यक्षांनी कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या उपस्थितीशिवाय एका लष्करी अधिकाऱ्याला जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.
ट्रम्प आणि मुनीर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?जवळपास दोन तास चाललेल्या या भेटीत ट्रम्प आणि मुनीर यांच्यात व्यापार, आर्थिक विकास आणि क्रिप्टोकरन्सी या विषयांवर चर्चा झाल्याचं म्हटलं जातं. या भेटीत ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात मुनीर यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. "त्यांना इथे बोलावण्यामागचं कारण हेच होतं की, मी त्यांना युद्ध न करण्याबद्दल आणि संघर्ष संपवल्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो," असं ट्रम्प म्हणाले होते.
या भेटीनंतर मुनीर यांनी ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, ट्रम्प बऱ्याच काळापासून भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचं श्रेय घेत आहेत. दुसरीकडे, भारताने हे स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तानी DGMOने विनंती केल्यानंतरच शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता.
पाकिस्तानकडे ट्रम्प यांचा वाढता कल?अलीकडेच, 'ट्रूथ सोशल'वर ट्रम्प यांनी लिहिलं होतं, "आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक करार पूर्ण केला आहे. यात पाकिस्तान आणि अमेरिका त्यांच्या तेल साठ्यांच्या विकासासाठी एकत्र काम करतील. आम्ही अशी एक तेल कंपनी निवडण्याच्या प्रक्रियेत आहोत, जी या भागीदारीचं नेतृत्व करेल. कोण जाणे, कदाचित ते (पाकिस्तान) एके दिवशी भारतालाही तेल विकतील."
शिवाय, अमेरिकेने पाकिस्तानला टॅरिफमध्ये देखील दिलासा दिला आहे. आधी लावण्यात आलेलं २९ टक्के शुल्क कमी करून १९ टक्के करण्यात आलं आहे.
भारत आणि अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील तणावजनरल मुनीर यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान, तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव कायम आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि 'ऑपरेशन सिंदूर' च्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढला आहे.
दुसरीकडे, व्यापाराच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतही तणाव आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. शिवाय, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. याआधीही अमेरिकेने भारतावर २५ टक्के शुल्क लावलं होतं.