एडिनबर्ग : स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्य सार्वमतांर्गत गुरुवारी मतदान झाले. यात बहुतांश नागरिकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केले असल्यास ब्रिटन फुटून युरोपात एक नवा देश अस्तित्वात येईल व युगोस्लावियाच्या फाळणीनंतरची ही सर्वात मोठी घडामोड ठरेल.
सुमारे 97 टक्के स्कॉटिश नागरिकांनी म्हणजे जवळपास 43 लाख नागरिकांनी मतदानाकरिता नोंदणी केली होती. यावरून सार्वमताबाबत लोकांत किती प्रचंड उत्साह आहे हे दिसून येते. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश नागरिक मतदान केल्यानंतर खूपच हळवे झाले होते. आपल्या दोन मुलांना शाळेत सोडून कामावर जाण्यापूर्वी मतदानासाठी आलेल्या 34 वर्षाच्या शेरलॉट फेरिशने सांगितले की, हा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. हा एक असा निर्णय आहे जो कायम स्मृतीत राहील आणि याचा परिणाम आमच्या मुलांवर होईल. ग्लासगोतील एडइन फोर्ड यांनी सांगितले की, मागील निवडणुकांपेक्षा यावेळी मला खूप वेगळे वाटत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या सव्रेक्षणाच्या निष्कर्षावरून असे वाटत होते की, ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळवू पाहणा:या गटाचा विजय होऊ शकणार नाही. मात्र, शेवटच्या दोन आठवडय़ांत खूप बदल दिसून आला. त्यामुळे सार्वमतात आता अटीतटीची लढत असल्याचे सव्रेक्षकांना वाटू लागले आहे.